भंगार एसटी बसचा कहर; बाहेर निघालेल्या पत्र्यामुळे मोटरसायकलचा अपघात, एक जण जबर जखमी
चिखली – 23 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क
चिखली तालुक्यातील पाटोदा गावात आज 23 जानेवारी रोजी सकाळी एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जबर जखमी झाला असून, एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. एसटी बसचा पत्रा बाहेर निघाल्याने हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की चिखली आगाराची पेन सावंगी – चिखली ही नियमित धावणारी एसटी बस पाटोदा गावातून जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या मोटर सायकलला धडकली. ही घटना गावातील अरुंद रस्त्यावर आणि वळण असलेल्या ठिकाणी घडली.या अपघातात भास्कर विष्णू खंदारे 65 वर्ष हे जबर जखमी झाले असून, मोटरसायकल चालवत असलेले भिकाजी काकफळे 35 वर्ष यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित एसटी बस फार स्पीडमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. गावाचा रस्ता लहान व अरुंद असतानाही बस वेगात चालवली जात होती. अपघाताच्या ठिकाणी वळण असून, बसच्या बाजूला सुमारे 12 इंचाचा लोखंडी पत्रा बाहेर निघालेला होता. हाच पत्रा मोटर सायकलवरील मागे बसलेल्या भास्कर खंदारे यांच्या अंगाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि अपघात घडला. एसटी बसची अवस्था पाहता ती अनफिट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अशा स्थितीत असलेली गाडी रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे संतप्त ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित बसची तात्काळ तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.


