ठाण्यातून आरोपी मुलाला भेटून परत निघाली पण,,, रायपूर पोलीस ठाण्या समोरची ह्रदयविदारक घटना
बुलडाणा – 8 ऑगस्ट, मिरर न्युज नेटवर्क
बकरी चोरीच्या प्रकरणात रायपूर पोलीस ठाण्यात अटक असलेल्या आरोपी मुलाची भेट घेऊन परत निघालेल्या आईला ठाण्या समोर भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली.यात त्या गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी त्यांना तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना काल 7 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की,बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाणे हद्दीतील भडगाव येथे बकरी चोरीच्या आरोपात कुणाल उत्तम साळवे रा. शेलुद ह.मु.सैलानी याला रायपूर पोलिसांनी अटक केली होती.आरोपी कुणाल साळवेला एका दिवसाची पोलीस कोठडीत असताना त्याची आई मृतक लक्ष्मी उर्फ सोनाबाई उत्तम साळवे वय 40 वर्ष ह्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास रायपुर पोलीस ठाण्यात आल्या होत्या.भेट झाल्यानंतर सैलानीकडे जाण्यासाठी त्या पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या.एवढ्यातच भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात सोनाबाईला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी तात्काळ त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. याप्रकरणी दुचाकी चालक आरोपी शुभम अशोक फोलाने रा.रायपूर याच्याविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी आज 8 ऑगस्टला सायंकाळी दिली आहे.


