शेतकऱ्याला मागून धडक देऊन झाला फरार,, गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडला,, उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू
बुलडाणा – 7 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
आपल्या शेतातील गोठ्याची साफसफाई व जनावरांना चारापाणी करून घराकडे परतणाऱ्या 45 वर्षीय शेतकऱ्याला मागून भरधाव वेगात आलेली बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. यात शेतकरी गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा आज 7 जुलै रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास बुलडाणा येथील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.धडक दिल्यानंतर बोलेरो वाहन घटनास्थळावरून पडून गेला होता.माहिती मिळताच त्याचा पाठलाग करून गावकऱ्यांनी त्याला दुधा येथे पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणा तालुक्यातील हतेडी बु. येथील शेतकरी गजानन दिगंबर जाधव वय 45 वर्ष हे 5 जुलै रोजी सकाळी आपल्या शेतात गेले होते व त्यांनी शेतातील गोठ्याची साफसफाई व जनावरांना चारापाणी करून घराकडे परत येत असतांना गावाजवळ सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास बुलडाण्याहून धाडच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना अगोदर बुलडाणा व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचार अशक्य असल्याने त्यांना परत बुलडाणा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पिकअप वाहन मालक सय्यद अलीम सय्यद हबीब वय 22 वर्ष रा.वरुड ता.जि. बुलढाणा याच्या विरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


