वन क्षेत्रात चाललंय काय????वन जमिनीत पोकलँडने खोदकाम करणाऱ्यांना आरएफओचा अभय? गंभीर आरोप करत वरिष्ठाकडे केली तक्रार
बुलडाणा – 3 जुलै, मिरर न्यूज नेटवर्क
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा वनपरिक्षेत्रात भोसा बिट क्रमांक 559 मध्ये वनजमीन वहीती करणा-यांना प्रोत्साहन देऊन वनक्षेत्रात विहिरीचे खोदकाम करणा-या विरुद्ध कारवाई न करता आर्थिक संबंध जोपासणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिका-या विरुद्ध सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवासह प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर,मुख्य वनसंरक्षक अमरावती, उपवनसंरक्षक बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
चंद्रकांत खरात यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की देऊळगाव राजा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या सिंदखेडराजा वर्तुळ मधी भोसा बीट, कक्ष क्रमांक 559 मध्ये काही इसमांनी वन जमिनीची जेसीबी, पोकलॅंडच्या माध्यमाने साफसफाई करून शेत जमीन तयार करून या पावसाळ्यात पेरणी करण्याचा माणस आहे.विशेष बाब म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जाणीवपूर्वक या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले असून,अतिक्रमण धारका सोबत आर्थिक हित साधत 20 एकर वनजमीन
वहीती करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मागील महिन्यात याच अतिक्रमित क्षेत्रात पोकलँड मशीन द्वारे विहीरीचे खोदकाम होत असतांना वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळगाव राजा यांनी विहिरीचे खोदकाम करणाऱ्या पोकलॅड मशीन चालकास थांबवून दमदाटी केली परंतु त्याच्यावर जप्तीची कारवाई न करता जागेवर लाखो रुपयांची आर्थिक तडजोड करुन पोकलॅड मशीन सोडून दिली.याबाबत फक्त शेतकऱ्यावर थातूरमातूर वन गुन्हा नोंद करुन शेतकऱ्यांना बळीचा बकरा बनवत आहेत. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे अतिक्रमण धारकांना पाठबळ असून पोकलँड मशीनवर कारवाई न करता सोडून देणारे वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळगाव राजा (प्रा ) यांच्यावर बडतर्फीची कारवाई होऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी केली आहे.