परप्रांतीय मजुरांच्या वाहनांवर कारवाई करु नका,आ.संजय गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाना दिले पत्र
बुलडाणा – 3 ऑक्टोबर, मिरर न्युज नेटवर्क
राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले. परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक डोळ्या देखत बर्बाद झाले. सद्यस्थितीत खरिप पिकाचे हंगाम सुरू झाले आहे,परंतू आस्मानी संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना सोंगणी कामासाठी मजुर मिळत नसल्याने नवे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आ.संजय गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाकडे मजूरीसाठी येणाऱ्या परप्रांतीय मजूरांच्या वाहनावर कारवाई करण्यात येवू नये अशी मागणी आज 3 ऑक्टोबर रोजी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात 7 लाख 50 हजार हेक्टरवर यंदा खरीपाची पेरणी करण्यात आली होती. परंतू जिल्ह्यात सुमारे 4 वेळा अतिवृष्टी नोंदवण्यात आली.या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील जवळपास सर्वच तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिवळया झाल्या, तर काही ठिकाणी सडल्या. अनेक तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमीनी खरडून गेल्याने नुकसान झाले आहे.आता उर्वरित मोजक्याच शेतकऱ्यांकडे खरीप हंगामातील पीके उरली आहे.सदर पीके हे सोंगणीला आली आहे. परंतू जिल्हयात मजूर मिळत न सल्याने आता शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात मजूर नसल्याने मोताळा व बुलडाणा तालुक्यात मध्यप्रदेशातून मजूर आणले जातात. सदर परप्रांतिय मजूर एकाच वाहनातून तसेच खेड्या-पाड्यातील मजुरांना त्यांच्या सोयीनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी येणे-जाणे करावे लागते. अशावेळी पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या वाहनांना अडवून त्यांना आधारकार्ड,ओळखपत्र, वाहतूकीचा परवाना आदी मागण्याकरुन नाहक त्रास दिला जातो आर्थिक पिवळणूक केली जाते,पोलिसांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. त्यामुळे शेती कामासाठी येणारे-जाणारे मजूरांच्या वाहनाची अडवणूक करुन त्यांना त्रास देण्यात येवू नये,पोलीस विभागाने मजुरांच्या गाड्यांची अडवणूक करू नये अशी मागणी आ.संजय गायकवाड यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात केली आहे.

