मोताळ्यात 4 दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान,बुलडाणा आणि मलकापूरच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी घेतली होती धाव
बुलडाणा – 18 मे, मिरर न्युज नेटवर्क
मोताळा येथील आठवडी बाजार परिसरातील खरबडी रोडवरील जय भवानी किराणा दुकानासह लगतच्या चार दूकानांना अचानक भीषण आग लागली. ही घटना शनिवारी 17 मे रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच आग विझवण्यासाठी बुलडाणा आणि मलकापूरचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते,अशी माहिती आज 18 मे ला दुपारी बुलडाणा अग्निशमन विभागाने दिली आहे.
मोताळा येथील मुख्य बाजार पेठेतील खरबडी रोडवरील जय भवानी किराणा दुकान, हेअर सलून,जय दुर्गा इलेक्ट्रॉनिक्स व ओम टेलरिंग या 4 दुकानांना अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.दोन टँकरच्या माध्यमातून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान, बुलडाणा व मलकापूर येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत संबंधीत दुकान मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी जाधव यांनी आज रविवारी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे.

