रात्रीच्या अंधारात 10 तास “कुठे” सुरू होते “हे” रेस्क्यू ऑपरेशन???? 50 फुट खोल विहिरीत पडलेल्या अस्वलाचे प्राण वाचविण्यास अखेर यश
बुलडाणा – 25 मे, मिरर नेटवर्क
बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी गावाजवळ असलेल्या एका शेतातील विहिरीत अस्वल पडल्याची घटना काल 24 मेच्या सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उघळकीस आली. याची माहिती आरएफओ चेतन राठोड यांना मिळताच ते वन्यजीव विभागाचे कर्मचारी तसेच प्रादेशिक वन विभागाची रेस्क्यू टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले.पूर्ण रात्र जवळपास 10 तासाच्या अथक प्रयत्नाने अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करत बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले आहे.
अस्वलासाठी पोषक वातावरण असल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचे अधिवास आहे. या अभयारण्यातील देव्हारी गावाजवळ एका शेतातील कठडे नसलेल्या 50 फूट खोल विहिरीत अस्वल पडले होते. ही बाब काल शुक्रवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन्यजीव विभागाला माहिती दिली. वन्यजीव विभागाचे कर्मचारी तसेच प्रादेशिक वन विभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली परंतु तोपर्यंत रात्रीचा अंधार झाला होता. विहिरीत जवळपास 10 फूट पाणी असल्याने अस्वलाला बेशुद्ध करून बाहेर काढणे अशक्य होते म्हणून आरएफओ चेतन राठोड यांनी अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. त्यामुळे विहिरीत मोटर लावून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला परंतु अस्वलाने पाईप फोडून टाकले.त्यानंतर विहिरीत पिंजरा टाकण्यात आला पण अस्वल हुलकावणी देत होता. लाकडी शिडी तयार करून ती विहिरीत टाकली तरीही अस्वल बाहेर येत नव्हता. शेवटी दोरीची शिडी विहिरीत टाकण्यात आली आणि त्याच्या सहाय्याने आज शनिवारी सकाळी 5 वाजेच्या सुमारास अस्वल विहिरीतून सुखरूप बाहेर निघून जंगलाच्या दिशेने पळून गेला.
अस्वल रेस्क्यूची यांनी बजावली कामगिरी
देव्हारी गावाजवळ 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या अस्वलाचा रेस्क्यू ऑपरेशन जवळपास 10 तास चालला.अधिकारी कर्मचाऱ्यांनी या अस्वलाचे प्राण वाचवण्यासाठी पूर्ण रात्र घालवली.ही कामगिरी आरएफओ चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात वनपाल संजय राठोड,वनपाल समाधान मांटे,रेस्क्यू टीमचे संदीप मडावी,अमोल चव्हाण,वन्यजीव विभागाचे नितेश गवई,राजेंद्र सूर्यवंशी,प्रवीण भांडे, समाधान गुगळे, गोरक्षसनाथ जगताप, संजीवनी खारोडे यांच्यासह वनमजूरांनी पार पाडली.