बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेचे “अशी” केली फसवणूक,, कोर्टाच्या आदेशाने “या” 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
बुलडाणा – 1 मे, कासिम शेख
बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेत आपली शेत जमीन व घर रजिस्टर गहाणखत करून दिल्यानंतर देखील जमिनीच्या दस्तएवजावर खोडखाड करून त्याची परस्पर विक्री केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली परंतु पोलिसांनी याची कोणतीच दखल न घेतल्याने शेवटी बँकेने बुलडाणा कोर्टाचे दार ठोठावले आणि कोर्टाने फसवणूक करणाऱ्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर 29 एप्रिलला रात्री बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हकीकत अशा प्रकारे आहे की राजू उर्फ राजेश आत्माराम देशमुख रा. साखळी खुर्द ता. बुलडाणा यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या बुलडाणा शाखेकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2011 रोजी वैयक्तिक व्यवसायाकरिता कॅश क्रेडिट कर्जासाठी अर्ज सादर केला होता.बँकेने त्यांना अटी व शर्तीनुसार दिनांक 11 एप्रिल 2011 रोजी 10 लाख रुपये कॅश क्रेडिट कर्ज मंजूर करून वितरित केले होते.या ऐवजी 20 एप्रिल 2011 रोजी साखळी खुर्द शिवारातील गट क्रमांक 351 मधील 0.04 हेक्टर आर जमीन, मोजे साखळी खुर्द शिवारातील गट क्रमांक 35 मधील 1.55 हेक्टर आर जमीन,मौजे साखळी खुर्द शिवारातील गट क्रमांक 96 मधील 1.00 हेक्टर आर जमीन, मोजे साखळी खुर्द शिवारातील गट क्रमांक 31 मधील 0.40 हेक्टर जमीन तसेच मौजे साखळी खुर्द येथील घर क्रमांक 2326 तसेच घर क्रमांक 241 बँकेत गहाण ठेवण्यात आले होते. अर्जदाराने बँकेकडे पुन्हा वाढीव कर्जाची मागणी केल्यावरून 23 एप्रिल 2012 रोजी त्यांना 8 लाखाचा कर्ज मंजूर करून वितरित करण्यात आला. बँकेने त्यांना असे एकूण 18 लाख रुपये कर्ज दिले होते. या सर्व मालमत्तेच्या 7/12 व गाव नमुना 8 अ वर बँक कर्जाचा बोजा नोंदविण्यात आला होता व सदर बोजा आज पर्यंत कायम आहे. राजू उर्फ राजेश आत्माराम देशमुख यांच्याकडील संपूर्ण कर्ज थकीत झाल्याने बँकेने कर्ज वसुली करिता बँकेत असलेल्या मालमत्तेचे दस्तऐवजांचा शोध घेतला असता त्यांनी इतर लोकांशी संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक करत बँकेत गहान ठेवलेल्या 6 मालमत्ता पैकी 3 शेत जमिनी या मालमत्तेची परस्पर रजिस्टर खरेदी खताद्वारे विक्री केल्याचे दिनांक 27 डिसेंबर 2018 रोजी बँकेच्या निदर्शनास आले. तर यातील जमिनीचा एक भाग रजिस्टर दानपत्र द्वारे एका संस्थेला दान देण्यात आला.हा सर्व फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बुलडाणा जिल्हा सहकारी बँक प्रशासनाने दोन वेळा बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली व एक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार देऊन कारवाईची मागणी केली परंतु पोलीस प्रशासनाने याकडे डोळेझाक केले. म्हणून बँकेने बुलडाणा न्यायालयात धाव घेतली. सीआरपीसी 156 (3) नुसार बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्ट क्रमांक 2 यांनी 24 एप्रिल रोजी दिले. त्यानुसार या फसवणुकीत सामील असलेले राजू उर्फ राजेश आत्माराम देशमुख, पंकज राजू देशमुख, राजेश्री राजेश देशमुख, विजया वसंतराव देशमुख, लताबाई जगन्नाथ देशमुख सर्व रा. साखळी खुर्द ता.जि.बुलडाणा आणि शेषराव किसन पवार रा.भडेच ले आऊट बुलडाणा यांच्याविरुद्ध 29 एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.