बुलडाणा – 29 मार्च बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यातील अनेक भागात आज 29 मार्चला सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसाचे आगमन झाले. यावेळी वादळी वाऱ्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील सवदड या गावात एकच हाहाकार माजला होता. शंभरहून अधिक घरावरील टीन पत्रे उडाली तर दोन बकऱ्यांचा मृत्यू व 1 महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादळी वाऱ्यामुळे लव्हाळा ते साखरखेर्डा मार्गावर अनेक झाडे उन्मळून पडली होती त्यामुळे 2 ते 3 तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी परिस्थिती जाणून घेतली व प्रशासनाला कामाला लावले. माहिती मिळताच साखरखेर्डाचे ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी पुढाकार घेत रस्त्यावर पडलेली झाडे हटवली. वादळी वाऱ्यामुळे अनेक विद्युत खांब कोसळल्याने अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे.