घाटाखालील वाळू पोहोचत आहे बुलडाण्यात,बुलडाणा तहसीलदारांनी पकडला अवैध वाळूचा टिप्पर,वाहतूक मुदत संपलेल्या रॉयल्टीच्या आधारावर अवैध वाहतूक
बुलडाणा – 22 नोव्हेंबर, मिरर न्युज नेटवर्क
बांधकामासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा घटक म्हणजे वाळू आहे.नदीतून वाळू काढल्याने भूजल पातळी कमी होते, जैवविविधतेचे नुकसान होते आणि नैसर्गिक जलचक्रात बदल होतो, ज्यामुळे पूर येण्याचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त नदीकिनारी परिसरांचेही नुकसान होते तसेच मासे आणि इतर जलचरांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात.असे असतांना देखील वाळू माफिया नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करतात.काल रात्री बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी घाटाखालून येणाऱ्या अवैध वाळूच्या टिप्परला पकडले आहे.त्यामुळे घाटाखालून बुलडाण्यात येणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातून वाहणारे 2 प्रमुख नद्या आहे.त्यात घाटाखालच्या भागात “पूर्णा” तर घाटावरील भागात “खडकपूर्णा” नदी वाहते.याच 2 नद्यात वाळू माफियांचा साम्राज्य पसरलेला आहे.बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी वाळू माफिया विरोधात कडक भूमिका घेतल्यानंतर घाटावरील भागात वाळू माफियांच्या काळ्या कृत्यास लगाम लागल्याचे दिसत असले तरी घाटा खालील वाळू माफिया बेफाम झालेले आहे. इतकंच नव्हे तर जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरात देखील घाटाखालून टिप्पर द्वारे वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे.काल शुक्रवारी कडाक्याची थंडीत मध्य रात्री 2 वाजेच्या सुमारास बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे व चालक अशोक देवकर हे गस्तीवर असतांना मलकापूर रोड वरील रिलायंस मॉल समोर त्यांनी एका मिनी टिप्पर क्र. एमएच- 19,सीएक्स-2895 याला थांबवून चालक गोकुळ कांडेलकर याला विचारपूस केली असता त्याने सदर टिप्पर संजय रायबोले रा.मलकापूर यांचे असून बुऱ्हानपूर (मध्यप्रदेश) घाटाची वाहतूक मुदत संपलेले रॉयल्टी दाखवली.त्यामुळे सदर टिप्पर जप्त करून बुलडाणा शहर ठाण्यात जमा करण्यात आले असून मालकावर दंडात्मक कारवाई करणार,अशी माहिती तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी आज 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता दिली आहे.बुलडाणा शहरात अवैध वाळू वाहतूक करताना कोणी आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
मध्यप्रदेशची रॉयल्टी असली आहे की नकली???
घाटाखालील वाळूमाफियांनी शक्कल लढवली असून ते सर्रासपणे पूर्णा नदीतून वाळूचा अवैध उपसा करत असून वाहतुकीसाठी बुरहानपुर मध्य प्रदेश येथील रॉयल्टीचा उपयोग करीत आहे.याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून बुलडाणा तहसीलदार यांनी काल रात्री जे टिप्पर पकडले त्यात देखील बुऱ्हाणपूरची रॉयल्टी चालकासोबत होती.ही रॉयल्टी खरंच बुऱ्हानपूरची आहेत का?किंवा प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी इतर ठिकाणी छापून त्याचा उपयोग केला जात आहे?याचा खुलासा आता प्रशासनाने करणे गरजेचे झाले आहे.
1 ट्रिप तापीची नंतर “पूर्णा माय की जय”
काही वाळू माफिया मध्यप्रदेश येथील तापी नदीच्या घाटातून रितसर रॉयल्टी रॉयल्टी घेऊन वाळू आणतात. त्यांची वाहतूक पास जालना किंवा बुलढाणा जिल्ह्याच्या सीमा वरती भाग असलेला देऊळगाव राजा,सिंदखेडराजा असते.मात्र वाळू दिलेल्या ठिकाणापर्यंत जातच नाही.ही वाळू बुलडाण्यात टाकून त्याच तापीच्या रॉयल्टीच्या आधारावर पूर्णा नदीतून ते अवैधरित्या 2 ते 3 ट्रिप मारत असल्याची माहिती मिळाली आहे.

