खडकपूर्णा प्रकल्पाच्या भ्रष्टाचार प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल,निविदा प्रक्रियेत जोडली 5 बनावट प्रमाणपत्रे
बुलडाणा – मिरर न्युज नेटवर्क, 9 ऑक्टोबर
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत चोखासागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत अनेक प्रकारची अनियमित्ता झाल्याचे उघड होत आहे. मागील दीड महिना अगोदर एका ठेकेदाराविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झालेला असताना आता पुन्हा असाच एक भ्रष्टाचार वाशिम एसीबीच्या चौकशीत उघड झाला आहे.याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात मुंबईच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की,वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बालाजी रामकृष्ण तिप्पलवाड यांनी काल बुधवारी रात्री बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,बुलडाणा जिल्ह्यातील खडकपुर्णा प्रकल्पाच्या दगडवाडी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालवा कि.मी 13 ते 17 चे मातीकाम व बांधकाम या निविदेच्या प्रक्रियेमध्ये अधिक्षक अभियंता, बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ,बुलडाणाया कार्यालयात कंत्राटदार मे.एम.वाय.कंन्स्ट्रक्शनचे प्रो.प्रा.मोहम्मद यासीन सिद्दीकी राठोड (मयत) रा.माहीम, मुंबई यांनी पुर्व अर्हता प्रपत्रासोबत लोकसेवक यांनी जारी न केलेली एकुण 5 बनावट पुर्व अनुभव प्रमाणपत्रे तयार करून,ती खरी असल्याचे भासवून,निविदा प्रक्रियेमध्ये सादर करून पुर्व अर्हता निकष पुर्ण केले व निविदेस पात्र होण्यासाठी आवश्यक गुणांक प्राप्त करून निविदेचे काम मिळवुन शासनाची फसवणूक केली व कंत्राटदार यांनी स्वतःचा गैरफायदा करून घेतला आहे.अशा तक्रारीवर आरोपी ठेकेदार मोहम्मद यासीन मोहम्मद सिद्दीकी राठोड (मयत) रा.माहीम,मुंबई विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय चपाईतकर करत आहे.

