“तुम्ही दारू पिता” म्हणत मुलाकडून बापाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण,बापाच्या तक्रारीवर मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
बुलडाणा – 2 ऑक्टोबर, मिरर न्युज नेटवर्क
मुलगा जर दारू पिऊन घरी आला तर बापाकडून त्याला मारहाण होत असल्याचे अनेक उदाहरण आपण बघितले,परंतु जर याच कारणावरून मुलाने बापाला मारले तर याला आपण काय म्हणाल?? अशीच एक घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे.या प्रकरणी जखमी वडीलाच्या तक्रारीवर स्वतःच्या मुलाविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की फिर्यादी सुनील दिनकर वांजोळ वय 46 वर्ष रा.येळगाव ता. बुलडाणा यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की सोमवारच्या रात्री ते आपल्या साखळी बु.शिवारातील गोठ्यावर मित्रासोबत जेवण करून गप्पा मारत होते, तेवढ्यात त्यांचा मोठा मुलगा राहुल वांजोळ वय 19 वर्ष हा गोठ्यावर आला व म्हणाला की “तुम्ही लोकांवर दोन दोनशे रुपये उधळता,लोकांना दारू पाजता व तुम्ही सुद्धा दारू पिता” असे म्हणत गोठ्यातील कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले,तसेच “तू जर आता दारू पिला तर तुला जीवाने मारून टाकीन” अशी धमकी सुद्धा मुलाने आपल्या बापाला दिली आहे.बापाच्या अशा तक्रारीवरून आरोपी मुलगा राहुल वांजोळ याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


