बुलडाणा जिल्ह्यातील 2 शिक्षकांना शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित
बुलडाणा – 18 सप्टेंबर, मिरर न्युज नेटवर्क
समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांच्या यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येते.बुलडाणा जिल्ह्यातील 2 शिक्षक वर्ष 2024-25 करीता या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र ठरले असून बुलडाणा जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे.
राज्य शिक्षक पुरस्कार योजना 1962- 63 पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून ती शालेय शिक्षण विभागामार्फत राबविली जाते. सन 2021 – 22 पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आज 18 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून त्यात राज्यभरातील एकूण 109 शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक गटातुन बुलडाणा जिल्ह्यातील दीपक मुरलीधर उमाळे सहाय्यक शिक्षक,जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, लचारबन, ता. जळगाव जामोद यांचं तर माध्यामिक गटातुन सहाय्यक शिक्षक शरद दिगंबर देशपांडे,लीलाधर भोजराज चांडक विद्यालय मलकापूर यांचा समावेश आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त या दोन्ही शिक्षकांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.

