बुलडाणा तहसीलदार कुमरे यांनी पकडला अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा टिप्पर
बुलडाणा – 25 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क
महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करी थांबविण्यासाठी निरंतर कारवाया सुरू आहे, तरीही वाळूमाफिया प्रशासनाची नजर चुकवून आपले कृत्य करीत आहे. तर या वाळू माफियांना दणका देण्यासाठी अधिकारी देखील रस्त्यावर येत असून काल रात्री बुलडाणा तहसीलदारांनी जामठी – दहिद मार्गावरील देवपूर फाट्या जवळ एका हायवा टिप्परला अवैध वाळूची वाहतूक करताना पकडले आहे. 
आज रोजी बुलडाणा जिल्ह्यात एकही अधिकृत वाळू डेपो नाही तरीही जिल्ह्यातून वाहणारी खडकपूर्णा आणि पूर्णा या 2 प्रमुख नद्यातून रात्रीच्या वेळी हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा केला जात आहे.जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व अधिनस्त अधिकाऱ्यांना वाळू तस्करी थांबविण्याचे आदेश जारी केलेले आहे.त्यानुसार बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे आणि चालक अशोक देवकर हे काल रात्री देऊळघाट मार्गे धाडच्या दिशेने जात असताना देवपूर फाट्याजवळ एक टिप्पर समोरून येतांना दिसला, त्याला थांबवून चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिले व टिप्पर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.तहसीलदार कुमरे यांनी धाड पोलिसांशी संपर्क साधून पोलीस वाहन बोलविले आणि पकडलेल्या हायवा टिप्परला जप्त करून बुलडाणा येथील निवडणूक विभागाच्या इमारतीच्या मैदानात लावून दिले.या वाहनावर दंडात्मक कारवाई केली जाणार,अशी माहिती तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी दिली आहे.

