कोलवड जवळ ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात 1 युवक ठार तर 2 जखमी, बुलडाणा-धाड मार्गावरील घटना
बुलडाणा – 19 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क
रस्त्यावर जात असलेल्या ट्रॅक्टर चालकाने अचानक आपली दिशा बदलल्याने दुचाकी ट्रॅक्टरला धडकली आणि या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 2 तरुण गंभीर जखमी झाले.ही घटना बुलडाणा – धाड मार्गावरील कोलवड गावाजवळ आज 18 जानेवारीला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणा तालुक्यातील कोलवड गावातून एक ट्रॅक्टर माती घेऊन जात असतांना बुलडाणा – धाड मार्गावर भडेच यांच्या जिनिंग समोर अचानक ट्रॅक्टर चालकाने वळण घेतलं त्याच वेळी बुलडाण्याहून कोलवडच्या दिशेने जात असलेली दुचाकी या ट्रॅक्टरवर धडकली, यामध्ये अजय विजय मोरे वय 20 वर्ष रा. कोलवड याचा जागीच मृत्यू झाला तर साहिल मोरे वय 18 वर्ष आणि विवेक विजय मोरे वय 18 वर्ष दोघे रा.कोलवड हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येत गावकरी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले होते.बुलडाणा शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


