हिल स्टेशनच्या हिली म्हाडा कॉलनीत बिबट्याची एन्ट्री,बिबट्या आजारी असल्याची शक्यता??
बुलडाणा – 10 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क
- हिल स्टेशन म्हणजेच थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे इंग्रजांनी बुलडाण्याला जिल्हा मुख्यालय म्हणून घोषित केले होते. हे शहर अजिंठा पर्वत रांगेवर वसलेले आहे. या जंगल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हिंस्त्र प्राण्यांचे अधिवास असल्याने अनेक वेळा हे वन्यजीव शहराच्या दिशेने येतात.

बुलडाणा शहराचा विस्तारित भाग म्हणजे महाडा कॉलोनी अगदी अजिंठा पर्वतरांगेच्या काठावरच आहे. महाडा कॉलनी परिसरात आज 10 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास एक बिबट्याने प्रवेश केला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घरा बाहेर निघालेल्या काही नागरिकांना सदर बिबट्या दिसून आल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली होती. याची माहिती परिसरात होताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली, तर काही नागरिकांनी बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. बिबट्या आजारी असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याची माहिती बुलडाणा वन विभागाला देण्यात आली परंतु वन विभागाच्या रेस्क्यू पथकाच्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत बिबट्या दरीत निघून गेला होता. आता समाज माध्यमावर या बिबट्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.

