बुलडाणा सायबर पोलिसांची कामगिरी,20 लाखाची ऑनलाइन फसवणूक प्रकरणी सुरत येथील 3 आरोपी अटक
बुलडाणा – 25 डिसेंबर, मिरर न्यूज नेटवर्क
तंत्रज्ञानाच्या या युगात सामान्य नागरिकांना ऑनलाइन फसवले जात असून अशा घटना नेहमी उघडकीस येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची फसवणूक करणाऱ्या अतिहुशार आरोपी पर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.बुलडाणा येथील एका शिक्षकाची 20 लाखाची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी बुलडाणा सायबर पोलिसांनी 3 संशयित आरोपींना गुजरातच्या सुरत येथून अटक केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अशोक प्रकाश बुलकुडे वय 29 वर्ष रा.सुंदरखेड ता. बुलडाणा यांना जानेवरी 2024 मध्ये व्हाइट्सअपवर मॅसेज आले व त्यांना शेअर मार्केट मध्ये जास्त नफा देण्याचा आमिष देऊन त्यांच्या कडून जवळपास 20 लाख रुपये घेण्यात आले.इतकी मोठी रकमेची गुंतवणूक करून ही त्याचा परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी अशोक बुलकुडे यांनी बुलडाणा सायबर ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी बुलडाणा सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले.त्यानुसार एएसआय शकील खान,पोलीस कर्मचारी राजदीप वानखेडे, विकी खरात, राजू आडवे, कुणाल चव्हाण, ऋषिकेश खंडेराव तसेच पंढरी सातपुते यांचा एक पथक स्थापन करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला या पथकाने गुजरातच्या सुरत येथे जाऊन आरोपी सय्यद नवाज सय्यद समद वय 24 वर्ष, अल्ताफ उर्फ फैजल खान अजीज खान वय 27 वर्ष, शेख सुफीयान शेख इम्रान वय 23 वर्ष सर्व राहणार सुरत, गुजरात यांना अटक करून बुलडाणा येथे आणले. आरोपींना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


