लातूरच्या भाविकांची कार पेटून एकाचा जळून मृत्यू,चौघे जखमी,खामगाव जवळची घटना
बुलडाणा – 22 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क
कारचे टायर फुटल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडवर धडकल्याने त्याची पेट्रोल टाकी फुटली त्यामुळे कार मध्ये आग लागल्याची घटना आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजे दरम्यान घडली. या अपघातात एकाचा कारमध्येमच जळून कोळसा झाला.तर परिसरातील नागरीकांनी धाव घेत कारमधील चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.ही घटना बुलडाणा जिल्ह्यातुन जाणाऱ्या नागपूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर खामगाव जवळच्या हॉटेल सुदर्शन नजीक घडली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की,अमरावती येथून खामगावमार्गे उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाची कार क्रमांक एमएच 24 एडब्ल्यू 7904 हि खामगाव जवळ मार्गावरील हॉटेल सुदर्शन समोरून जात असतांना अचानक कारचा टायर फुटल्याने सदर कार डिव्हायडरवर जावून आदळली. यात कारच्या पेट्रोल टाकीचा भडका झाला आणि कारने पेट घेतला.यावेळी परिसरातील नागरीकांनी धावपळ करत आग विझविण्याचा प्रयत्न केला व कारमधील महिलांसह चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. परंतु कारमधील एकाचा जागीच जळून कोळसा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव अरूण बाबूराव चिंचणसुरे वय 72 वर्ष रा. लातुर असे आहे.तर परूत अरुण चिंचणसुरे (36), आशिष अरुण चिंचणसुरे (32), लक्ष्मी अरुण चिंचणसुरे (61), शारदा पुणे (55) सर्व रा. लातूर हे जखमी झाले आहे. जखमींना तातडीने खामगाव शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
महादेव फंड बनला देवदूत
कारचा अपघात झाल्याने सुदर्शन हॉटेल जवळ असलेले महादेव फंड रा. सतीफैल यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारने पेट घेतला होता. महादेव फंड यांने समयसुचकता दाखवून कारच्या खिडकीचे काच फोडून कारमधील दोघांना नागरीकांच्या साहाय्याने ओढून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचविले. त्याच्या या धाडसी कार्याबद्दल सर्वजन कौतुक करीत आहेत.