रात्री अस्वल येत असल्याने कर्मचाऱ्यांची उडाली घाबरगुंडी,वरवंड फाट्यावरील चेक पोस्ट हलविले दुसऱ्या ठिकाणी
बुलडाणा – 2 नोव्हेंबर, मिरर न्युज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. अनेक मार्गावर स्थिर सर्वेक्षण पथकाचे चेक पोस्ट लावण्यात आलेले असून वरवंड फाट्यावरील चेकपोस्ट जवळ रात्रीच्या वेळी अस्वल येत असल्याने या ठिकाणी रात्री ड्युटीवर तैनात कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहून प्रशासनाने सदरचे चेक पोस्ट हॉटेल गारवा, पिंपरखेड फाट्याजवळ हलविले आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की,बुलडाणा – खामगाव महामार्गावरील वरवंड फाट्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाचा चेक पोस्ट उभारण्यात आला होता. या चेक पोस्टवर 24 तास कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे.वरवंड फाटा हा भाग ज्ञानगंगा अभयारण्याला लागूनच आहे. वरवंड फाट्यावर अनेक हॉटेल्स असल्याने रात्रीच्या वेळी अस्वल अन्नच्या शोधात येत असतात.चेकपोस्टवर तैनात कर्मचाऱ्यांना रात्री अस्वल आपले दर्शन देत असल्याने कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली होती. याबाबतची माहिती कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरवंड फाट्यावरील चेक पोस्ट आता हॉटेल गारवा,पिंपरखेड फाट्याजवळ हलविण्यात आले आहे.