बुलडाणा आरएफओला मागितली 2 लाखांची खंडणी,मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
बुलडाणा – 20 सप्टेंबर
बुलडाणा आरएफओ अभिजीत ठाकरे यांच्याविरुद्ध अमरावती येथील सीसीएफ कार्यालय समोर उपोषण करत 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षा विरुद्ध 19 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास अमरावती येथील गाडगे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष शिवादादा पुरंदरे यांनी 19 सप्टेंबर पासून मुख्य वन संरक्षक अमरावती यांच्या कार्यालय समोर उपोषण सुरू केले होते. त्यांना उपोषणापासून प्रावृत करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने बुलडाणा आरएफओ अभिजीत ठाकरे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत उपोषण मंडपात पोहोचले परंतु उपोषणकर्त्याने माघार घेतली नाही, म्हणून आरएफओ ठाकरे यांनी शिवादादा पुरंदरे यांना म्हटले की आपण बाहेर कुठेतरी बसून शांततेत चर्चा करू आणि मार्ग काढू, त्यावर शिवादादा पुरंदरे यांनी होकार देत व्हाट्सअप कॉल करण्याचे सांगितले.आरएफओ ठाकरे हे अमरावती येथील रहिवासी असल्याने ते आपल्या घरी परतले आणि शिवादादा पुरंदरे यांना व्हाट्सअप कॉल केले असता पुरंदरे यांनी 2 लाख रुपयांची त्यांना मागणी केली. यावर ठाकरे यांनी येण्या जाण्याचा तसेच पेंडॉल साठी 20 हजार रुपये देण्यासाठी तयार झाले,पण पुरंदरे यांनी सहमती दर्शवली नाही. शिवादादा पुरंदरे यांनी माझी प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने व मला त्रास देण्याच्या उद्देशाने उपोषणास बसण्याचे नाटक करून माझ्याकडून 2 लाख रुपयांची मागणी केली,अशी तक्रार आरएफओ अभिजीत ठाकरे यांनी दिल्याने महाराष्ट्र नव नवनिर्माण विद्यार्थी सेना बुलडाणा जिल्हा अध्यक्ष शिवादादा पुरंदरे विरुद्ध अमरावती येथील गाडगे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.