“मला दिव्यशक्ती प्राप्त आहे”!!!सैलानीत भोंदू बाबाने रुग्णाच्या हाता-पायात बेड्या ठोकल्या,आता पोलिसांनी “भोंदू-बाबा”लाच बेड्या ठोकले
बुलडाणा – 5 जुलै, मिरर न्यूज नेटवर्क
सैलानी बाबांच्या दर्गावर उपचारासाठी आलेल्या एका मनोरुग्णाच्या हातात बेड्या टाकून त्याला साखळदंडाने बांधून अघोरी उपचार करणाऱ्या भोंदू बाबावर विरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात 5 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सैलानी येथे अशा पद्धतीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे.

या बाबत वृद्ध महिला सुमनबाई विठ्ठल जाधव रा.येनोली तांडा, ता. जिंतूर, जि. परभणी यांनी रायपूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,त्यांचा नातू “विक्की” हा मनोरुग्ण असून अंगावरील कपडे फाटून टाकतो,वेडे वाकडे हावभाव करतो,स्वतः ला मारून जखमी करतो आणि इतरांना त्रास देतो.त्यामुळे त्याच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. परंतू फरक न पडल्याने “विक्की” ला सैलानी येथे 7 मे 2024 रोजी आल्या होत्या.सैलानी येथे दर्गा परिसरातच उघड्यावरच झोपत होत्या. तेव्हा इरफान शहा रमजान शहा या भोंदू बाबाने त्यांची चौकशी करून आपण येथे सेवा करत असून आपल्याल्या दिव्यशक्ती प्राप्त झाल्याचे भोंदू बाबा इरफान शाहने सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच सैलानीतच एकाची रुम भाड्याने करून दिली.या कालावधीत उपचाराच्या नावाखाली तो दररोज 100 ते 200 रुपये घेत होता.

दरम्यान काही दिवस उपचार केल्यानंतर भूतबाधा अवघड असल्याचे सांगून “विक्की”च्या हातापायात बेड्या टाकून त्याला साखळदंडाने बांधले. सोबतच अघोरी उपचार करून त्यांची पिळवून केली,असे तक्रारीत नमूद केले आहे.रायपूर ठाण्यात आरोपी इरफान शहा रमजान शहा रा. सैलानी याच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा प्रतीबंध कायदा 2013 नुसार गुन्हा दाखल केला आहे.तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी भोंदू बाबा इरफान शहा यास ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात रायपूर ठाणेदार दुर्गेश राजूपत करीत आहे.


