बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या 3 पदाधिकाऱ्यांचा “ना-राजीनामा”!! लोकसभेनंतर विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला “ठेंगा”!!!आता विधानसभेत हिशोब चुकता करू,,,,
बुलडाणा – कासिम शेख,5 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या एक गठ्ठा मतांचा “टेकू” महाविकास आघाडीला मिळाला नसता तर आज राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी असती परंतु इमानइतबारे मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला साथ देऊन त्यांची “नय्या” पार केली आहे. मुस्लिम समाजाला आशा होती की लोकसभेत महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याकडून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात येईल परंतु तसे झाले नाही. तरीही मुस्लिम समाजाने “मोदी” नको म्हणून वंचीत,एमआयएम कडे दुर्लक्ष करत आपल्या मतांचा योग्य वापर केला. लोकसभेत उमेदवारी न मिळाल्याने मुस्लिम समाजात नाराजीचे सुर उमटत असताना देखील या गोष्टीवर पडदा टाकण्यात आला.
लोकसभा संपल्यानंतर विधान परिषदेची निवडणूक लागली आणि काँग्रेसकडून माजी मंत्री आरिफ नसीम खान,डॉ.वजाहत मिर्झा, एम.एम.शेख,मुजफ्फर हुसेन हे प्रबळ दावेदार होते तरीही पक्षश्रेष्ठींनी या वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारत दिवंगत खासदार राजू सातव यांच्या अर्धांगिनी यांना उमेदवारी घोषित करून दिली.काँग्रेसच्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजात रोष निर्माण झालेला आहे. संकटाच्या काळात काँग्रेसला भरभरून साथ देऊनही मुस्लिम समाजातील नेत्यांना नाकारून एका प्रकारे काँग्रेसने सर्व मुस्लिम समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे आता काँग्रेस मधील पदाधिकारी “ना-राजीनामे” देत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 3 मुस्लिम नेत्यांनी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
त्यात चिखली येथील डॉ.इसरार (सरचिटणीस,प्रदेश अल्पसंख्याक विभाग), शेगाव येथील डॉ.असलम खान (उपाध्यक्ष,प्रदेश अल्पसंख्याक विभाग) बुलडाणा येथील जाकीर कुरेशी (सहसचिव,प्रदेश अल्पसंख्याक विभाग) यांचा समावेश आहे.या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांना दिला आहे. यांच्यासह इतर मुस्लिम नेतेही राजीनामा देण्याच्या तयारीत असून येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसला धडा शिकवू, अशी भावना मुस्लिम समाजातून उमटत आहे.