सऊदी अरब येथील मक्का शहरात बुलडाणा जिल्हा परिषदेचे शिक्षक मो.सुफियान यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
बुलडाणा – 9 जून, मिरर न्युज नेटवर्क
पवित्र हज यात्रेसाठी मुस्लिम बांधव सऊदी अरबला जात आहे. या हज यात्रेकरूंना योग्य मार्गदर्शन व सेवेसाठी बुलडाणा जिल्हा परिषदेत शिक्षक पदावर कार्यरत असलेले मो.सुफियान मो.उस्मान हे सऊदी अरबला गेले असता त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना आज 9 जून रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सऊदी अरब येथील मक्का शहरात घडली आहे.
दरवर्षी देशभरातून लाखो मुस्लिम बांधव हज कमिटीच्या माध्यमातून पवित्र हज यात्रेसाठी सऊदी अरबला जातात. या यात्रेकरूंना योग्य मार्गदर्शन व त्यांच्या सेवेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सऊदी अरबला पाठवतात. यामध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळा जयपूर ता. मोताळा येथे कार्यरत शिक्षक मो.सुफियान मो.उस्मान वय 48 वर्ष रा.रोहिणखेड ह.मु.बुलडाणा हे मागील 1 जूनला सऊदी अरबला रवाना झाले होते. सद्या ते हज यात्रेकरू सोबत मक्का शहरात होते. आज रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले. मो.सुफियान हे अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभावाचे शिक्षक होते. मोहम्मद सोफियान यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. सायंकाळी मक्का येथील कब्रस्तानात त्यांची दफनविधी करण्यात आली आहे.