BREAKING :- भारतीय सैन्यातुन “तो” अरुणाचल प्रदेश येथून गावी आला,मावास भावाला भेटीसाठी पुण्याहुन बोलावले,,पण नियतीने दोघांवर घाला घातला
बुलडाणा – 3 जून , मिरर नेटवर्क
भारतीय सैन्यात अरुणाचल प्रदेश मध्ये कार्यरत जवान आपल्या गावी लिहा येथे आला होता. आज 3 जून रोजी सायंकाळी 5 :15 वाजेच्या सुमारास मोताळाहून लिहा गावाकडे परतत असताना भरधाव वेगात असलेली दुचाकी अनियंत्रित होऊन झाडाला जोरदार धडक दिली. यात सैन्य जवान व त्याचा मावस भाऊ जागेवरच ठार झाल्याची घटना बोराखेडी ते वडगाव रोडवर घडली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की मोताळा तालुक्यात लिहा येथील गजानन जगदेव सोळंके वय 35 वर्ष हे भारतीय सैन्यात अरुणाचल प्रदेश मध्ये कार्यरत आहे. 5 – 6 दिवसा अगोदरच ते सुट्टीवर आपल्या गावी लिहा येथे आले होते. पुणे येथे विमानतळावर कार्यरत दीपक महादेव पवार वय 33 वर्ष रा.अंत्री ता.मोताळा हल्ली मुक्काम पुणे या मावस भावाला भेटीसाठी गजानन सोळंके यांनी पुण्याहून बोलावले होते. दोघेही आज दुपारी दुचाकीने मोताळा येथे गेले होते. तेथून सायंकाळी गावाकडे परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला व यात दोघेही मरण पावले. त्यांचे प्रेत बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले आहे. माहिती मिळताच बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांनी रुग्णालयात येऊन नातेवाईकांना धीर दिला. तसेच बोराखेडीचे ठाणेदार सारंग नवलकर हे सुद्धा रुग्णालयात पोहोचले होते.