“भूलतज्ञा”लाच आपल्या कर्तव्याचा “विसर”!!! जिल्हा स्त्री रुग्णालयात भूलतज्ञ डॉक्टरने काढली प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची छेड
बुलडाणा – 12 मे
बुलडाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑन कॉल ड्युटीवर कार्यरत भुलतज्ञ डॉक्टराला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असून त्याने येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या एका डॉक्टर तरुणीची छेड काढल्याची धक्कादायक घटना काल 11 मे रोजी रात्री घडली असून याप्रकरणी डॉक्टर तरुणीने स्त्री रुग्णालय प्रशासनाकडे लिखित तक्रार केली आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन 3 महिने प्रशिक्षण घ्यावे लागते.याकरिता बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर येत असतात व त्यामध्ये तरुणींचा देखील समावेश असतो. बुलडाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात 8 दिवसा अगोदर प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीसोबत शनिवारी रात्री स्त्री रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. स्त्री रुग्णालयात एनआरएचएम अंतर्गत ऑन कॉल तत्त्वावर कार्यरत भुलतज्ञ डॉ.अविनाश सोळंके याने तरुणीचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बाब त्या तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने वरिष्ठांना कळविले. रात्री स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉ.प्रशांत पाटील हे स्वतः रुग्णालयात पोहोचले व त्यांनी परिस्थिती सांभाळली.आज 12 मेला त्या तरुणीचे पालक स्त्री रुग्णालयात पोहोचले व घाबरलेल्या तरुणीला धीर दिला. तसेच “लफडेबाज” भुलतज्ञ डॉ.अविनाश सोळंके विरुद्ध पिडीतेने लेखी तक्रार दिली आहे. याप्रकरणाची चौकशी करून भूलतज्ञ डॉ. सोळंकेवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉ.प्रशांत पाटील यांनी दिली आहे.