बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई,भडगाव शिवारात मुरुमाचे अवैध उत्खनन करतांना 3 टिप्पर 1 जीसीबी पकडले
बुलडाणा – 3 मे कासिम शेख
बुलडाणा तालुक्यात गौण खनिज माफीयांनी शासकीय व खाजगी जमिनीतून मुरूमाचे अवैध उत्खनन करण्याचा जणू सपाटाच लावलेला आहे. असे प्रकार तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. गौण खनिजाचे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना असतांना देखील ते “अर्थ”पूर्ण कारणाने याकडे दुर्लक्ष करीत आहे.मात्र भडगाव शिवारात खाजगी जमिनीतून विनापरवानगी अवैध उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना मिळताच त्यांनी आज 3 मेला दुपारी 1 वाजेच्या सुमारास आपल्या पथकासह सदर ठिकाणी धाड टाकून 3 टिप्पर व 1 जीसीबी पकडले आहे.या धडक कारवाईमुळे धाड परिसरातील गौणखनिज माफीयांचे धाबे दणाणले आहे.
बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात अवैध गौणखनिज उत्खननांचे प्रमाण अधिक आहे. खाजगी वापरासाठी मुरूमाचे उत्खन तर केले जातेच परंतु रस्त्यांच्या कामासाठी सुद्धा शासकीय ठेकेदार अशाच प्रकारे विनापरवाना मुरुमाचे उत्खनन करून विनापरवाना वाहतूक करीत आहे.आज शुक्रवारी बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना माहिती मिळाली की भडगाव शिवारातील रस्त्याच्या कडेला गट क्रमांक 226 मध्ये असलेली टेकडी मध्ये मुरुमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक केली जात आहे.तात्काळ तहसीलदार कुमरे यांनी मंडळ अधिकारी सदानंद हिवाळे,कोतवाल सुनील रामेकर,सुरक्षा रक्षक गजानन शिरतापे व चालक अशोक देवकर या पथकाला सोबत घेऊन धाड टाकली असता त्या ठिकाणी जेसीबीने मुरूमाचे उत्खनन सुरू होते व त्या ठिकाणी 3 टिप्परने अवैध वाहतूक केली जात होती. या पथकाने तिन्ही टिप्पर व जेसीबी जप्त करून धाड पोलीस ठाण्यात आणून उभे करून दिले आहे. अवैध उत्खनन करून हे मुरुम कुंबेफळ येथील रस्त्याच्या कामाला नेले जात असल्याची माहिती समोर आली असून सदर वाहने जालना येथील पप्पू आनंद यांचे असल्याचे बोलले जात आहे.
अवैध गौणखनिज करणाऱ्यावर कारवाई करू!तहसीलदार कुमरे
बुलडाणा तालुक्यात कोणीही गौणखनिजाचे अवैध उत्खनन करू नये, जर कोणी अवैध उत्खनन करताना आढळून आला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असा इशारा बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी दिला आहे.