शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सोबत राहणार ‘गनमॅन”!! जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली होती पोलीस सुरक्षा देण्याची मागणी
बुलडाणा – 1 मे
बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मैदान गाजवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी चांगली लढत दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.प्रचार सुरू असतांना त्यांनी सत्ताधारी खासदार प्रतापराव जाधव यांना लक्ष केले होते.खा.जाधव यांच्या समर्थनार्थ आ संजय गायकवाड यांनी तुपकर यांच्यावर धामणगाव बढे येथील प्रचार सभेत तोफ डागली होती आणि याचे प्रत्युत्तर रविकांत तुपकर यांनी शेगाव येथे आ.संजय गायकवाड यांना दिले होते. हजारोंच्या सभेत आ. संजय गायकवाड यांच्यावर सरळ शाब्दिक हल्ला केल्याने आ.संजय गायकवाड खवळले आणि त्यांनी चक्क फेसबुक लाईव्ह करून रविकांत तुपकर यांची शिकार करू असा गंभीर इशारा दिला होता.
(फाईल फोटो)
इतकेच नव्हे तर महायुतीच्या इतर नेत्यांनी देखील तुपकरावर हल्लाबोल केला होता. प्रचार काळात झालेल्या आरोप-प्रतिआरोपा मुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण सद्याही तापलेला आहे. अशात रविकांत तुपकर यांना आपल्या जीवाला धोका असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केली होती.हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर रविकांत तुकारांना एक गनमॅन देण्यात आल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांनी आज 1 मेला सायंकाळी दिली आहे.