सिंदखेडराजा येथील “खादाड” तहसीलदार बुलडाणा एसीबीच्या जाळ्यात
बुलडाणा – 12 एप्रिल
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि लोणार या 3 तालुक्यातून खडकपूर्णा नदी वाहत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया सक्रिय आहे. अनेक वाळूमाफिया अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगणमत करून सर्रासपणे वाळूची अवैध वाहतूक करत शासनाचा महसूल बुडवत आहे.
सिंदखेडराजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी एका वाळू माफिया कडून हप्त्याची मागणी केली होती.असा आरोप करत सदर वाळू माफियाने याची तक्रार बुलडाणा एसीबीकडे दिल्यानंतर आज 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराला मागणीनुसार 35 हजार रुपये त्याने दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने धाड टाकून तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्यासह त्यांच्या वाहनावरील चालक व शिपाई असे तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बुलढाणा जिल्हा महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून एसीबीची कारवाई सद्या सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.