बुलडाणा – 7 एप्रिल : बुलडाणा शहरातील स्टेट बँक जवळ जुन्या डीएड हाॅस्टेलच्या जागेचे वाॅल कम्पाऊंड, आयसीटी रिसाेर्स सेंटरची इमारत व इतर साहित्याची अज्ञात आराेपींनी ताेडफाेड केली आहे. यामध्ये महाविद्यालयाचे जवळपास 1 काेटी 36 लाख 12 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर घटना 11 मार्चला 10 वाजता घडली असून डीएड कॉलेजच्या प्राचार्य डॉ.सीमा सुरेश लिंगायत यांच्या फिर्यादीवरून बुलडाणा शहर पाेलिसांनी 6 एप्रिलला अज्ञात आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.बुलडाणा शहरातील मध्यवर्ती स्टेट बॅंकेजवळ शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा यांच्या नावाने एक भूखंड आहे. एकूण 17 हजार 989. 30 चाैरस मीटर क्षेत्रफळ असलेला हा भूखंड महाविद्यालयाची शैक्षणिक संकुलाची जागा आहे. या जागेमध्ये जुन्या निवासाची इतर साहित्य, तसेच या जागेला कम्पाऊंड केलेले होते, त्याला लाेखंडी गेट बसवलेले हाेते व त्यावर महाविद्यालयाचे नामफलक लावलेले हाेते. या जागेच्या आवारामध्ये रुसा अंतर्गत आयसीटी रिसाेर्स सेंटरचे नवीन बांधकाम सुरू हाेते. त्यामध्ये नवीन वीज मिटरसुद्धा घेतलेले हाेते. 11 मार्च राेजी अज्ञात आराेपींनी वॉल कम्पाऊंड, तसेच निर्माणाधिन आयसीटी रिसाेर्स सेंटरचे नवीन बांधकाम, जुनी निवासाची इमारत साहित्य, लोखंडी गेट व त्यावरील फलक, नवीन वीज मीटर तोडून शासकीय मालमत्तेचे अंदाजे 1 काेटी 36 लाख 12 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.सीमा लिंगायत यांनी शहर पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात आराेपींविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.